मुंबई : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातील अनियमिततेची गंभीर दखल घेत राज्याचे पणन संचालक संजय कदम यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रशासक कालावधीत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे आणि ५० गुंठे जमीन भाजीपाला व्यापारी संघटनेस देण्याच्या निर्णयांची ही चौकशी होणार असून, कोकण विभागीय सहनिबंधक आदिनाथ दगडे यांना एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे कल्याण बाजार समितीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 नेमकी प्रकरणे काय आहेत?

 सातवा वेतन आयोग: समितीतील जुने ४६ कर्मचारी आणि १८ एप्रिल २०२५ रोजी सरळसेवेतून नव्याने भरती झालेल्या ३५ कर्मचाऱ्यांना प्रशासक कालावधीत सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयाची तपासणी होणार आहे.

 जमीन वाटप प्रकरण: बाजार समितीच्या सर्वे क्रमांक २८२ व २८४ मधील तब्बल ५० गुंठे जमीन ‘लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेस’ देण्याच्या व्यवहाराचीही सखोल चौकशी केली जाणार आहे.

 कायदेशीर कारवाई आणि पुढील प्रक्रिया

बाजार समितीच्या कामकाजाविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम ४० (ब) आणि नियम १९६७ मधील नियम ११७ अन्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत. चौकशी अधिकारी आदिनाथ दगडे यांनी या दोन्ही मुद्द्यांची कसून तपासणी करून, स्पष्ट अभिप्राय आणि समर्थनीय कागदपत्रांसह सविस्तर अहवाल पणन संचालनालयास सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. तसेच, चौकशीसाठी लागणारी सर्व माहिती, मूळ कागदपत्रे, अहवाल आणि नोंदवह्या तात्काळ उपलब्ध करून देण्याचे सक्त निर्देश बाजार समितीच्या सचिवांना देण्यात आले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *