मुंबई, दि. २६ : जमीन मोजणी, फेरफार आणि मिळकत पत्रिकांसाठी होणारी पायपीट आता कमी होणार आहे. राज्यातील नागरिकांची जमीन आणि मालमत्तेशी निगडित कामे जलद, पारदर्शक व सोप्या पद्धतीने मार्गी लागावीत, यासाठी भूमि अभिलेख विभागाच्या सेवांचे सुसूत्रीकरण करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार विभागाच्या जुन्या २० सेवांतील काही सेवा एकत्र करून, गरज नसलेल्या सेवा बंद करून आणि एका नव्या सेवेची भर घालून एकूण ६ प्रमुख सेवा निश्चित करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नियोजन विभागाच्या नियमांनुसार आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मान्यतेनंतर महसूल विभागाने याबाबतचा आदेश जारी केला. नागरिक, सरकारी विभाग आणि व्यावसायिकांसाठी या ६ सेवा ऑनलाइन पोर्टल, ‘आपले सरकार’ आणि ‘मैत्री’ पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत.
या असतील ६ प्रमुख सेवा
* जमीन मोजणी: सर्व प्रकारची जमीन मोजणी आणि काम पूर्ण झाल्यावर मोजणी नकाशाची ‘क’ प्रत देणे.
* आकारफोड व नकाशा दुरुस्ती: आकारफोड, कमी-जास्त पत्रक तयार करणे आणि नकाशातील दुरुस्ती.
* फेरफार नोंदी: सर्व प्रकारच्या फेरफार नोंदी.
* जुने नकाशे व अभिलेख: ऑनलाइन नसलेले नकाशे किंवा जुनी कागदपत्रे उपलब्ध करून देणे.
* मिळकत पत्रिकेचे विभाजन: मिळकत पत्रिकेचे भाग पाडून स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे.
* भूसंपादन मिळकत पत्रिका: भूसंपादनात रस्ता, रस्ता सेट-बॅक आणि आरक्षित जागेसाठी स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे.
काय बंद, काय एकत्र आणि नवी सेवा कोणती?
ज्या जुन्या नोंदी किंवा कागदपत्रांचे स्कॅनिंग व संगणकीकरण होऊन ती आधीच ऑनलाइन दिसतात, अशा कागदपत्रांच्या प्रती देणाऱ्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यात मिळकत पत्रिका, मुंबई उपनगर मिळकत पत्रिका, टिपण, क्षेत्रबुक, प्रतिबुक, शेतपुस्तक, जबाब, फाळणी, आकारबंद, गटनकाशा, मोजणी नकाशा आणि अपील निकालाच्या नकला या सेवांचा समावेश आहे.
नेहमीची आणि घाईची मोजणी, विविध प्रकारची आकारफोड, कमी-जास्त पत्रकाला मंजुरी, सर्व प्रकारच्या फेरफार नोंदी, मिळकत पत्रिकेचे भाग पाडणे आणि भूसंपादनाची स्वतंत्र मिळकत पत्रिका यांसारख्या सारख्या कामांच्या सेवा एकत्र केल्या आहेत. याशिवाय, जे मूळ कागदपत्र किंवा नकाशे अजून ऑनलाइन नाहीत, त्यांचे स्कॅनिंग आणि माहिती भरून ती ‘ई-महाभूमी’ पोर्टलवर टाकण्याची नवी सेवा सुरू करण्यात आली आहे.
अपील व अंमलबजावणी अशी होणार
या कामांबाबत तक्रार किंवा अपील करायचे असल्यास पहिल्या अपीलासाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख किंवा उप अधीक्षक भूमि अभिलेख / नगर भूमापन अधिकारी असतील. दुसऱ्या अपीलासाठी उपसंचालक भूमि अभिलेख यांच्याकडे जाता येईल. निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी नियम व तांत्रिक सूचना जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (पुणे) देतील, तर ऑनलाइन व्यवस्था तयार करून ती जोडण्याचे काम भूमि अभिलेख विभाग व ‘महाआयटी’ करणार आहेत.
“नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात मिळाव्यात, यासाठी आम्ही काम करत आहोत. भूमि अभिलेख विभागाच्या २० सेवांचे सुसूत्रीकरण करून ६ प्रमुख सेवांमध्ये रूपांतर केल्यामुळे अनावश्यक कागदपत्रे, फेऱ्या आणि मंजुरीचे टप्पे कमी होतील तसेच सर्व सेवा कालबद्ध पद्धतीने उपलब्ध होतील. — चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
