अलिबाग (ओमकार नागावकर) : अलिबाग–रेवदंडा रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असूनही अद्याप अपेक्षित प्रगती झालेली नाही. MSIDC आणि संबंधित ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे कुरूळ, बेलकडे, चौल आणि नागाव परिसरातील नागरिकांना गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या आठवड्यात याच मार्गावरील अपघातांत दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी सूचना फलकांचा अभाव, बॅरिकेड्सची अपुरी व्यवस्था आणि रात्रीच्या वेळी वाहनचालकांना धोक्याची जाणीव करून देणारी प्रकाशव्यवस्था नसल्याचे चित्र आहे. वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णवाहिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दोन नागरिकांचे जीव गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येणार नसेल, तर आणखी किती बळींची प्रतीक्षा केली जात आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच रस्त्याच्या कामाचे योग्य नियोजन, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, सूचना फलक, बॅरिकेड्स आणि रात्रीची पुरेशी प्रकाशव्यवस्था होईपर्यंत काम तात्पुरते थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. या अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असेल, तर तो विकास कसला? ठेकेदाराच्या निष्काळजीपणाची किंमत सामान्य नागरिकांनी आपल्या प्राणांनी का मोजायची? असा सवाल शिवसेना ठाकरे पक्षाने उपस्थित केला आहे. प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, विभागप्रमुख गिरीश शेळके, शहर प्रमुख तथा नगरसेवक संदीप पालकर, शिवसैनिक कमलेश खरवले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
