डोंबिवली : गेली जवळपास तीन दशके सामाजिक क्षेत्रात अविरत कार्यरत असणाऱ्या डोंबिवलीच्या ‘लोकसेवा समिती’तर्फे भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शुक्रवार, २० नोव्हेंबर ते रविवार, २९ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार असून, यादरम्यान दररोज सायंकाळी ५ ते १० या वेळेत रसिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील अरुणोदय सोसायटी, चिनार मैदान येथे हा महोत्सव संपन्न होणार आहे.
महोत्सवाची ठळक वैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रम
कोकण महोत्सवात कोकणची समृद्ध संस्कृती आणि परंपरा अनुभवण्याची सुवर्णसंधी रसिकांना मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील कार्यक्रमांचा समावेश आहे.
- पारंपरिक लोककला: कोकणातील सुप्रसिद्ध समई नृत्य, रायगड जिल्ह्यातील शक्तीतुरा, मालवण तालुक्यातील दिंडी आणि ट्रिकसीनयुक्त पारंपरिक दशावतार.
- संगीत व भजने: सुप्रसिद्ध संगीतकारांची भजने आणि डबलबाऱ्या.
- धार्मिक सोहळा: देवादिकांची पालखी आणि भव्य मिरवणूक.
- विशेष आकर्षण: कोकणातील अस्सल उत्पादनांची बाजारपेठ आणि बालदोस्तांसाठी ‘बालनगरी’.
- गौरव सोहळा: या महोत्सवादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
डोंबिवलीचे लोकप्रिय आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सर्वांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. त्यामुळे डोंबिवलीकर आणि परिसरातील नागरिकांनी या दहा दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकसेवा समिती’चे सचिव चारुदत्त राणे यांनी केले आहे.
