अलिबाग (ओमकार नागावकर) : सत्तेचा माज चढलेल्यांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान केल्याच्या निषेधार्थ अलिबागमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन छेडले. रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात शायना एन.सी. आणि शिंदे गटाविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका पक्षाचे नेते नसून लाखो शिवसैनिकांच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या छायाचित्राची विटंबना झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर रायगडमधील शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. सत्तेच्या जोरावर कोणालाही शिवसैनिकांच्या भावना पायदळी तुडवता येणार नाहीत, असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला.
यावेळी तालुका संघटिका स्नेहल देवळेकर यांनीही आक्रमक शब्दांत संताप व्यक्त केला. “सत्तेत बसल्यामुळे काही जणांना माज चढला असेल; मात्र त्या सत्तेच्या नशेत त्यांनी बाळासाहेबांचा अवमान करण्याचे धाडस करू नये. बाळासाहेबांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. हा अपमान केवळ एका छायाचित्राचा नसून लाखो शिवसैनिकांच्या भावना आणि अस्मितेवर केलेला घाव आहे. यापुढे अशा प्रकारची पुनरावृत्ती झाली, तर आजचे आंदोलन केवळ इशारा समजावा. शिवसैनिकांचा आवाज अधिक बुलंद होईल आणि आंदोलन यापेक्षाही तीव्र स्वरूपात उभे राहील,” असा इशारा त्यांनी दिला.
सत्तेची खुर्ची कायमस्वरूपी नसते; मात्र बाळासाहेबांनी निर्माण केलेला विचार आणि शिवसैनिकांच्या मनातील त्यांचे स्थान अढळ आहे, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होत्या. घोषणाबाजीने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, युवा जिल्हाधिकारी अमीर ठाकूर, तालुकाप्रमुख शंकर गुरव, प्रवक्ते धनंजय गुरव, नगरसेवक तथा शहरप्रमुख संदीप पालकर, विधानसभा संघटक कृष्णा कडवे, उपजिल्हा संघटक अजित पाटील, तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, कुर्डूस विभागप्रमुख प्रणाली पाटील, जितेंद्र जैन, मिलिंद खानोलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
