कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी): जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचे केंद्रबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध महासंघाच्या अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अखेर महायुतीने बाजी मारली आहे. महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी १६ विरुद्ध १३ मतांनी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या समविचारी पॅनेलचे उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव करत अध्यक्षपदावर कब्जा केला.
हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील आणि महाडिक गट विरुद्ध सतेज पाटील अशा अटीतटीच्या ठरलेल्या या राजकीय संघर्षात अखेर सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीचा विजय झाला. मात्र, या निकालानंतर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, “हा केवळ आमचा पराभव नाही, तर कोल्हापूर, महाराष्ट्र आणि लोकशाहीचा उघड अपमान आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
४ शासननियुक्त संचालकांचा गेमचेंजर ठरलेला ‘फॅक्टर’
गोकुळच्या एकूण २५ जागांच्या निवडणुकीत जनतेने सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी पॅनेलला १३ जागांवर विजय मिळवून देत स्पष्ट कौल दिला होता, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, अध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी १४ सदस्यांच्या कोरमची अट आवश्यक होती. महायुतीचे १२ संचालक बैठकीला गैरहजर राहत असल्याने सतेज पाटील गटाला अध्यक्ष निवडता येत नव्हता. हा राजकीय पेच सोडवण्यासाठी महायुती सरकारने तडकाफडकी ४ नवीन संचालकांची नियुक्ती केली. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी निवडणूक पार पडली आणि या ४ नियुक्त संचालकांच्या बळावर महायुतीने सत्ता आपल्या हातात घेतली.
‘विषय कोरमचा नव्हता, तर सत्ता हडपण्याचा’ — सतेज पाटील
निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सतेज पाटील सरकारवर आक्रमकपणे बरसले. ते म्हणाले: आमच्याकडे स्पष्ट बहुमत होते आणि जनतेचा कौलही आमच्यासोबतच होता. तरीही सरकारने चार संचालक लादवून लोकशाहीची उघड हत्या केली. मूळ विषय कोरमचा नव्हताच, तर गोकुळवर कशीही करून सत्ता मिळवण्याचा होता. जर कोरमचाच विषय असता, तर त्यांनी आपल्या १२ संचालकांना बैठकीला पाठवले असते. पण तसे न करता अध्यादेश काढून सत्ता हडपली गेली.
३ महिन्यांत ‘मनपसंत’ संचालकांची एन्ट्री?’ — पाटलांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांनी एक राजकीय बॉम्ब टाकला. सूत्रांच्या हवाल्याने दावा करताना ते म्हणाले की, सध्या नियुक्त केलेले ४ संचालक हे केवळ ‘का तात्पुरते’ म्हणजेच ३ महिन्यांसाठीच आहेत.ही सरकारची ठरवून केलेली खेळी आहे. हे चार संचालक अवघ्या तीन महिन्यांत राजीनामा देतील आणि महायुतीच्या नेत्यांच्या ‘मनातले’ (खास) संचालक मागेमागून आत शिरतील,”* असा खळबळजनक दावा सतेज पाटील यांनी केला.
पुढील राजकीय वळण काय?
गोकुळच्या या निकालानंतर कोल्हापूरचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीने सहकारातील महत्त्वाची संस्था आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवले असले, तर सतेज पाटील यांनी लावलेला हा आरोप आणि ३ महिन्यांनंतरच्या घडामोडींकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सतेज पाटलांचा हा ‘सूत्र’ दावा खरा ठरतो की महायुती आपली सत्ता अबाधित ठेवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
