ठाणे : दिवाळीच्या ऐन सणात ठाण्यातील रहेजा गार्डन परिसरातील ‘रहेजा कार्लाइन’ या १७ मजली इमारतीत रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. ८ व्या मजल्यावरून सुरू झालेली ही आग पाहता पाहता १४ व्या मजल्यापर्यंत पसरली आणि ७ मजल्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, ठाणे अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी तातडीने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे इमारतीत अडकलेल्या ५० रहिवाशांसह पाळीव प्राण्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदारांसह ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी इमारतीतील रहिवाशांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. धुराचे लोट पसरल्याने लिफ्टचा वापर अशक्य झाला होता. अशा स्थितीत रहिवाशांना रिफ्युजी एरिया आणि गच्चीवर थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. अग्निशमन दलाने अत्याधुनिक ड्रोनचा वापर करून अडकलेल्या नागरिकांचा अचूक शोध घेतला आणि शिडी व स्ट्रेचरच्या साहाय्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढले.

ठाणे जिल्ह्यात हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर दोन महिने बंदी

ही आग फटाक्यांमुळे लागली की शॉर्ट सर्किटमुळे, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात घेता ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी रात्री उशिरा मोठा निर्णय घेतला. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हवेत उडणारे फटाके आणि रॉकेट्स उडवण्यास पुढील दोन महिन्यांसाठी )९ नोव्हेंबर ते ८ जानेवारी २०२७) कठोर बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या इमारतींचे परिसर, पार्किंग आणि मोकळ्या जागांमध्ये या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार थेट कारवाई केली जाईल.

अग्निशमन पथकाने अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने नेमके कोणत्या मजल्यावर रहिवाशी अडकले आहेत, हे शोधणे शक्य झाले आणि ५० जणांचे प्राण वाचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *