नाशिक/त्र्यंबकेश्वर : वैदिक मंत्रांचा मंगलघोष, शंखनादाचा निनाद आणि गोदामाईच्या अखंड प्रवाहाच्या साक्षीने बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाचा आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात ऐतिहासिक प्रारंभ झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत रामतीर्थावर, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या सािध्न्यात त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या अलौकिक सोहळ्याने अवघी गोदाकाठची नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.
रामतीर्थावर राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजारोहण
नाशिकच्या रामतीर्थावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रथम यज्ञकुंडात आहुती अर्पण करत आणि जीवनदायिनी गोदावरीचे विधिवत पूजन करत धार्मिक विधी पार पाडले. मंत्रघोषात धर्मध्वजा आकाशात डौलाने फडकताच उपस्थितांच्या डोळ्यांत श्रद्धा आणि आनंदाचे भाव दाटले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच विविध आखाड्यांचे महंत, धर्माचार्य व साधू-संत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर येथेही धार्मिक परंपरेचा मंगलारंभ
दुसरीकडे, त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या उपस्थितीत कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. गणपतीपूजन, गोदावरीचे स्तवन आणि ध्वजस्तंभाच्या पूजनानंतर वैदिक मंत्रोच्चारात धर्मध्वजा फडकविण्यात आली. या सोहळ्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंहस्थ धर्मध्वजाची वैशिष्ट्ये आणि शुभचिन्हे
या सिंहस्थ धर्मध्वजावर भारतीय संस्कृती आणि ज्योतिषीय परंपरेचे दर्शन घडविणारी विविध शुभचिन्हे अंकित करण्यात आली आहेत.
- अमृतकुंभ: अमरत्व, मुक्ती आणि देवी शक्तीचे प्रतीक.
- ॐकार: सकारात्मकता, संपूर्ण विश्वाचा सर्वव्यापकतेचा संदेश.
- सूर्य, चंद्र, बृहस्पती व सिंह: सिंहस्थाच्या ज्योतिषीय कालगणनेशी संबंधित प्रतीके.
- मगर: गोदावरीच्या तीर्थपरंपरेची खूण.
- १२ रेशमी गोंडे: सामाजिक एकता आणि संघशक्तीचे प्रतीक.
गोदावरीच्या तीरावर फडकलेली ही धर्मध्वजा
देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांना आगामी सिंहस्थ महापर्वाचे मंगलमय निमंत्रण देत असून, यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा जोडला गेला आहे.






