
कल्याण: 26 ;(विशेष प्रतिनिधी):
भिवंडी लोकसभा क्षेत्रात आपण मागील दहा वर्षांत हजारो कोटींची विकासकामे केली, अशी ठाम भूमिका माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मांडली. मात्र, विद्यमान खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी जर गेल्या वर्षभरात इतकीच कामे केली असतील, तर त्यांनी ती दाखवावी, आपण त्यांचा नागरी सत्कार करू, असा खोचक टोला देत त्यांनी म्हात्रे यांच्या दाव्यांची खिल्ली उडवली.
कल्याणमध्ये आयोजित एका वार्तालाप कार्यक्रमात कपिल पाटील पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी आपल्या दहा वर्षांच्या खासदारकीत झालेल्या ठळक विकासकामांचा आढावा सादर करत, कल्याण मेट्रो, सुभाष मैदान येथील प्रस्तावित इनडोअर स्टेडियम, नवी मुंबईतील दि. बा. पाटील विमानतळ नामकरण, भिवंडी-वाडा रस्त्याची दुरवस्था, मराठी-अमराठी वाद, केडीएमसी निवडणूक, तसेच कल्याण स्टेशन परिसरात सुरू असलेले सॅटीसचे काम या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
कामं दाखवा – आपण आकस ठेवणार नाही
जर एखादी व्यक्ती खरंच विकासकाम करत असेल, तर ती कोणत्या पक्षाची आहे हे महत्त्वाचे नाही. पण त्यांनी ती कामे दाखवली पाहिजेत. आपण कमीत कमी 28 ते 29 हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करून त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. उलट, सध्याचे खासदार म्हणतात की आम्ही एका वर्षात इतकी कामे केली, मग त्यांनी ती दोन-चार कामे तरी दाखवावी, असे म्हणत कपिल पाटील यांनी नाव न घेता बाळ्या म्हात्रे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
कल्याण मेट्रो रखडली, जबाबदार कोण ?
भिवंडी शहरातील मेट्रोचे 85 टक्के काम पूर्ण झाले असतानाही कल्याण मेट्रो रखडल्यामागे तत्कालीन आघाडी सरकारची उदासीनता जबाबदार असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. बदललेल्या डीपीआरला मान्यता न दिल्यानेच हे काम रखडले, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही डीपीआर मंजूर केले असून, लवकरच कल्याण मेट्रोच्या कामास गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिजामाता यांचे नाव वापरून भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा
पाटील यांनी राजमाता जिजामाता यांचे नाव वापरून भ्रष्टाचार करणाऱ्या संस्थेवरही निशाणा साधला. जिजामाता या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून एखादी संस्था बोगस काम करत असेल तर ती गंभीर बाब आहे. राज्य सरकारने अशा संस्थेची चौकशी करावी, असा इशारा देत त्यांनी जिजाऊ संघटना आणि शिंदे गटाचे उपनेते निलेश सांबरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
भिवंडी-वाडा रस्ता मृत्यूमार्ग झाला आहे
भिवंडी-वाडा महामार्गावरील दुरवस्थेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या रस्त्यामुळे आतापर्यंत 21 जणांचे बळी गेले असून, अनेक अपघातग्रस्तांना अपंगत्व आले आहे. या प्रश्नावर अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलने केली असून, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
