कल्याण, दि. 26 जुलै :”गेल्या दहा वर्षांत मी भिवंडी लोकसभा मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामं केली. विद्यमान खासदारांनी जर गेल्या वर्षभरात एवढं काम केलं असेल, तर त्यांनी दाखवावं – मी स्वतः नागरी सत्कार करायला तयार आहे!” अशा शब्दांत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी विद्यमान खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्यावर नाव न घेता तीव्र टीका केली.कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कपिल पाटील यांनी आपला दहा वर्षांचा कारकिर्दीतील विकासकामांचा आढावा घेत अनेक मुद्द्यांवर सडेतोड मत मांडलं. कल्याण मेट्रो प्रकल्प, भिवंडी-वाडा महामार्ग, केडीएमसीमधील सॅटीस प्रकल्पाची झालेली सुमार प्रगती, आणि मराठी-अमराठी वाद अशा अनेक ज्वलंत मुद्द्यांवर त्यांनी परखड भाष्य केलं.> “कामं दाखवा, विरोध विसरा”कपिल पाटील म्हणाले, “कोणीही पक्षाचं असो, जर त्यानं जनतेच्या भल्यासाठी काम केलं असेल तर तो आपला आहे. गेल्या दहा वर्षांत 28 ते 29 हजार कोटींची विकासकामं मंजूर झाली आहेत आणि ती प्रत्यक्षात सुरूही आहेत. मात्र एखाद्यानं वर्षभरात एवढी कामं केली असं म्हणणं म्हणजे जनतेची थट्टा आहे.”

कल्याण मेट्रो रखडली आघाडी सरकारमुळेभिवंडी मेट्रोचे सुमारे 85% काम पूर्ण असून कल्याणकडील मेट्रोचे काम तत्कालीन आघाडी सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे रखडलं, असा आरोप त्यांनी केला. “सद्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपीआर मंजूर केल्याने कल्याण मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘जिजामाता’ नाव लावून भ्रष्टाचार? – कपिल पाटील यांचा अप्रत्यक्ष इशारा”राजमाता जिजामाता हे महाराष्ट्रासाठी श्रद्धास्थान आहेत. जर कुणी संस्था त्यांचं नाव वापरून बोगस आणि भ्रष्ट कारभार करत असेल, तर शासनाने त्वरित चौकशी करावी,” असा ठणकावून इशारा देत त्यांनी निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेच्या कामकाजावर नाव न घेता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.विशेषतः भिवंडी-वाडा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे आतापर्यंत 21 निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

“मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, चौकशी लवकरच सुरू होईल”या गंभीर प्रकरणांबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार झाल्याचं स्पष्ट करत कपिल पाटील यांनी चौकशी लवकरच सुरू होईल असा सूचक इशाराही दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *