ठाणे: शिवसेना उबाठा पक्षाचे नेते प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी ठाण्यात तीव्र पडसाद उमटले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याकडे आंदोलनासाठी निघालेले राम पूर्णेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर संतप्त सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर तब्बल ३ तास रास्ता रोको करून परिसर ठप्प केला.

राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतल्यानंतर उबाठा माजी खासदार राजन विचारे, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, काँग्रेसचे राहुल पिंगळे व पूर्णेकर कुटुंबातील जयनाथ पूर्णेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याला वेढा घातला. आरोपींना अटक केल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा घेत हरिनिवास रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे रोखली. परिस्थिती चिघळल्याने पोलिसांनी वाहतूक लगतच्या उड्डाणपुलावरून वळवली.

“मी बॉम्ब किंवा बंदूक घेऊन गेलो नव्हतो. वडिलांना न्याय मागण्यासाठी एकटा शांततेत जात असताना पोलिसांनी मला खेचून आणले,” असा आरोप राम पूर्णेकर यांनी केला.

“सर्व पुरावे देऊनही हत्येचे सूत्रधार पोलीस बंदोबस्तात फिरत आहेत. पोलिसांनी आपल्या शपथेची तरी जाण ठेवावी. न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाऊन मोठे जनआंदोलन उभारू,” असा इशारा जयनाथ पूर्णेकर यांनी दिला.

मनसेचे अविनाश जाधव यांनी आरोप केला की, “राबोडीतील जमील शेख हत्येचे सूत्रधार अजून मोकाट आहेत, आता तीच पुनरावृत्ती इथे केली जात असून पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत.

मीनाक्षी शिंदे यांची साडेसहा तास चौकशी

दरम्यान, ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या एसआयटी (SIT) टीमने माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची साडेसहा तास सखोल चौकशी केली. चौकशीनंतर शिंदे म्हणाल्या, “माझे पती आणि मी पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. प्रभागातील लोकांसोबत फोटो असणे स्वाभाविक आहे. पाखरे हाकलण्याच्या बंदुकीवरून संशय घेतला जात असेल तर त्याला काय उत्तर देणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *