
डोंबिवली, दि. १३ ऑगस्ट – डोंबिवली शहर व विशेषतः कल्याण-शिळफाटा मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या कोंडीला मेट्रोच्या कामातील कंत्राटदारांचा बेशिस्तपणा आणि शहरात बेकायदेशीरपणे धावणाऱ्या अवजड वाहनांची भर पडली आहे. परिणामी, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक तास कोंडीत अडकून रहावे लागत आहे.
या गंभीर समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) ने पुढाकार घेत, कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर आणि डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांची भेट घेतली. यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात अवजड वाहनांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण आणणे, मेट्रो कामासाठी पर्यायी मार्ग योजना आखणे, तसेच वाहतूक पोलीस दलाची संख्या वाढवणे अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या.
या भेटीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डोंबिवली शहराध्यक्ष भालचंद्र (भाऊ) पाटील, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे, कल्याण ग्रामीण अध्यक्ष मधुकर माळी आणि डोंबिवली शहर कार्याध्यक्ष रविकिरण बनसोडे उपस्थित होते. पक्षाने प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
