कल्याण पश्चिमेतील कोंडी सोडवण्यासाठी सहजानंद चौकात लागू करण्यात आलेल्या वाहतूक बदलांबाबत ट्रॅफिक डीसीपी पंकज शिरसाट हे लवकरच प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांना दिले आहे.या संदर्भात श्रेयस समेळ यांनी ठाणे वाहतूक शाखेचे डीसीपी शिरसाट यांची भेट घेऊन शेकडो नागरिक, व्यापारी, हौसिंग सोसायटी प्रतिनिधी व जागरूक नागरिकांच्या हरकती आणि सूचना सादर केल्या.सहजानंद चौक हा कल्याण पश्चिमेतील एक प्रमुख चौक असल्याने वाहतूक पोलिसांनी येथे नवीन बदल लागू केले. मात्र या बदलांमुळे संतोषी माता रोड, काळा तलाव व आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परिणामी स्थानिक नागरिक व व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.ही वस्तुस्थिती समजावून सांगत, नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही अधिसूचना तातडीने रद्द करण्याची मागणी समेळ यांनी केली. यावर प्रतिसाद देताना ट्रॅफिक डीसीपींनी येत्या आठवड्यात कल्याणात भेट देऊन सहजानंद चौकातील परिस्थिती स्वतः पाहण्याचे आणि त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.या संदर्भात श्रेयस समेळ यांनी स्पष्ट केले की, वाहतूक कोंडी हा नागरी प्रश्न असून त्याला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ट्रॅफिक डीसीपींच्या आगामी भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *