डोंबिवली :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील डोंबिवली पश्चिम विभागातील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, हृदयनाथ भोईर तसेच माजी नगरसेविका हर्षदा भोईर व केडीएमटीचे माजी सदस्य शैलेंद्र भोईर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
गेल्या दोन दशकांपासून या माजी नगरसेवकांचे त्यांच्या प्रभागात भक्कम वर्चस्व आहे. त्यामुळे काँग्रेस सोडून त्यांनी भाजपाची कास धरल्यानंतर स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी उघड झाल्याची कुजबुज होत असली तरी माजी नगरसेवकांनी यास नकार दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही नाराजीमुळे पक्ष बदललेला नाही. सत्ताधारी पक्षात राहिल्यास मोठ्या प्रमाणावर विकास निधी मिळतो. नागरिकांच्या प्रलंबित कामांना गती देण्यासाठी आणि प्रभागाचा विकास वेगाने व्हावा म्हणूनच भाजपात प्रवेश केला.” काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनीही निधी दिल्याचे मान्य करत त्यांनी मात्र मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यास अधिक कामे शक्य असल्याचे सांगितले.
यावेळी माजी नगरसेवकांनी क्लस्टर विकास योजनेबाबतही भूमिका मांडली. “डोंबिवलीत जुन्या इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र क्लस्टर योजनेत एरिया वाढवल्याने रहिवाश्यांना घरे मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. हा एरिया कमी करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिल्लीपर्यंत पाठपुरावा करू,” असे त्यांनी सांगितले.
