गॅस वितरण क्षेत्रातील चार दशकी अनुभवाची दखल; राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव

डोंबिवली:२५ ( विशेष प्रतिनिधी) –
कल्याण शहरात १९८० पासून भारत गॅसचे यशस्वी वितरण करणाऱ्या गुरुकृपा गॅस कंपनीचे संचालक महेश तपासे यांची महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या कार्यकारीअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरांतून स्वागत होत असून, राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रीय भारत गॅस वितरक संघटनेचे अध्यक्ष कैलास दुधानी आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी महेश तपासे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी किशोर सोडा, अतुल शहा, अरुण वेटेकर, उषा पूनावाला, सरोज अहिरे आणि शिरीष वारंगे यांचे पूर्ण समर्थन लाभले.
या निवडीनंतर आपल्या प्रतिक्रिया देताना महेश तपासे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील गॅसधारकांना जलद, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे.” त्यांनी कोविड काळातील आठवण काढताना नमूद केले की, लॉकडाऊनच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही गॅस वितरक बांधवांनी जीव धोक्यात घालून सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवला होता.
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत राज्यभरात गॅस वितरकांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे देशपातळीवर संघटनेचे कौतुक झाले. महाराष्ट्र शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाखो लाभार्थी महिलांपर्यंत गॅस वितरण करण्याचे मोठे योगदान वितरकांनी दिले आहे, असेही तपासे यांनी सांगितले.
गॅस पाईपलाईनच्या वाढत्या वापरामुळे गॅस सिलेंडरची मागणी आता शहरातील अविकसित भाग तसेच ग्रामीण भागापुरती मर्यादित राहिली आहे. त्यामुळे वितरकांसमोर आर्थिक अडचणींचे नवे आव्हान उभे राहिले आहे. यासोबतच, गॅस सिलेंडर वितरणासाठी आता ग्राहकांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ओटीपीची अट अनिवार्य झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच ग्राहकांनी पाच वर्षांतून एकदा गॅस रबर ट्यूब बदलणे, आणि अधिकृत वितरक मेकॅनिककडून गॅस उपकरणांची आवश्यक तपासणी करून घेणे गरजेचे आहे, असे आवाहन करत गॅस गळतीच्या वेळी तात्काळ उपाययोजनांबाबत महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महेश तपासे यांच्या नेतृत्वात गॅस वितरक संघटनेचे काम अधिक गतिमान आणि जनहितकारी होईल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
