ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, भ्रष्टाचाराचा पुन्हा भोंगळ कारभार उघड

 

डोंबिवली:- २४ ( विशेष प्रतिनिधी)- 

   कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कारभार नेहमीच वादग्रस्त ठरलेला असतानाच, महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना एकाच दिवशी लाच घेताना अटक झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात केडीएमसीच्या जल-मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील हे अधिकारी अडकले आहेत.

   महापालिकेच्या जल व मलनिस्सारण विभागात उपअभियंता पदावर कार्यरत असलेले रविंद्र आहिरे यांनी एका विकासकाकडून एनओसी देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. विकासकाने ही माहिती एसीबीकडे दिल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि आहिरे यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.

त्याच दिवशी, केडीएमसीच्या घनकचरा विभागातील मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर आणि प्रभारी स्वच्छता अधिकारी सुदर्शन जाधव यांनी एका आजारी कर्मचाऱ्याला पुन्हा नोकरीवर हजर करून घेण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित कर्मचाऱ्याने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीवर कारवाई करत या दोन्ही अधिकाऱ्यांना कार्यालयातच लाच घेताना पकडले.या प्रकरणामुळे केडीएमसीमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

महापालिकेच्या कारभारावर आधीपासूनच भ्रष्टाचाराचे गडद सावट आहे. गेल्या चार दशकांत केडीएमसीचे तब्बल ४७ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकले आहेत. 

—

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *