
डोंबिवली : पश्चिमेतील सुभाष रोडवरील धोकादायक खड्ड्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली असून, प्रशासनाच्या निष्क्रीयतेचा अनोख्या पद्धतीने निषेध करत खड्ड्यांत रोपटे लावण्यात आले. अपघातांच्या घटना घडण्याआधीच जागे व्हा, असा इशारा देत या आंदोलनात शिवसेनेच्या शहर, विधानसभा आणि शाखास्तरीय पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग होता

डोंबिवली पश्चिमेकडील सुभाष रोड खड्डेमय झाल्याने वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्या उपस्थितीत विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, सांस्कृतिक अधिकारी मिलींद दुडवडकर, उपशहरप्रमुख संजय पाटील आणि श्यामराव चौगुले, विभाग प्रमुख राजेंद्र सावंत, विभाग अधिकारी अनिल मुथा, शाखाप्रमुख तुषार नाईक, ओमकार पांचाळ, वराडकर, कार्यालयप्रमुख (डोंबिवली पूर्व) नारायण गायकवाड, कैलास सणस, प्रवीण साळवी यांसह अनेक शिवसैनिकांनी सुभाष रोडवरील रस्त्यातील खड्ड्यांत रोपटे लावले.डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे म्हणाले, “प्रशासन लक्ष देत नसल्याने त्यांना जागे करण्याकरता आम्ही हे निषेध आंदोलन केले असून, आता तरी प्रशासनाने जागे व्हावे. अपघात झाल्यावर खड्डे बुजविणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले, “स्थानिक नागरिक आमच्या शाखेत रस्त्याच्या खड्ड्यांबाबत तक्रारी घेऊन येतात. हे काम प्रशासनाचे आहे, त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
