
डोंबिवली – सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या हिसकावणाऱ्या एका धडाडीच्या चोरट्याला डोंबिवली पोलिसांनी अटक करत मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, रात्री हॉटेल मॅनेजर म्हणून काम करणारा हा इसम दिवसा चक्क चैन स्नॅचिंग करत होता. परेश किशोर घावरी (वय ३५, रा. शंकरराव चौक, कल्याण पश्चिम) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल पावणे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून सकाळी फिरणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने हिसकावून पलायन करणाऱ्या टोळक्याने अक्षरशः दहशत निर्माण केली होती. गुन्ह्यांची मालिका वाढत असल्याने पोलिसांनी विशेष मोहीम आखली होती. ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार अँटी चैन स्नॅचिंग पथक तयार करण्यात आले होते. आरोपी सतत दुचाकी बदलत असल्यामुळे शोध घेणे मोठे आव्हान ठरत होते.२३ जून रोजी डोंबिवली पूर्व ९० फूट रोडवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १,८०,००० रुपये किंमतीची २० ग्रॅम सोन्याची चैन हिसकावण्यात आली होती. त्यानंतर ९ जुलै रोजी देखील सौ. मंजू अनिल शहा या महिलेला सकाळच्या वेळेत गळ्यातील चैन हिसकावण्यात आली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा कसून तपास करत तब्बल १७२ सीसीटीव्ही फुटेज तपासली आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी परेश घावरीला कल्याणमधून ताब्यात घेतले.प्राथमिक चौकशीत आरोपीने डोंबिवली पोलीस ठाण्यातील २ आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील १ अशा एकूण ३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ५,५५,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत. यात १,८०,००० रुपये किंमतीची २० ग्रॅम चैन, ९०,००० रुपये किंमतीची १० ग्रॅम चैन, तसेच पल्सर मोटरसायकल आणि यामाहा स्कूटरचा समावेश आहे.या कारवाईमुळे डोंबिवली पोलिसांचे विशेष पथक आणि तांत्रिक तपास कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पुढील तपास डोंबिवली पोलीस ठाणे करत आहे.
