डोंबिवली, १२ जुलै – अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसाचा दर्जा मिळाल्यानंतर डोंबिवलीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. या ऐतिहासिक निर्णयानंतर शनिवार १२ जुलै रोजी डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं.यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यक्रमाला डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, प्रिया जोशी, डॉ. सर्वेश सावंत, हरीश जावकर, मयुरेश शिर्के आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या वेळी भाजपचे हरीश जावकर म्हणाले, “आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा आहे. ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि शौर्याचा जागतिक सन्मान आहे.”कार्यकर्ते कृष्णा पाटील म्हणाले, “हे किल्ले केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत तर आपली अस्मिता आहेत. रायगड, राजगड, शिवनेरी, प्रतापगड, विजयदुर्ग, पन्हाळा, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, साल्हेर, खांदेरी आणि जिंजी ही आपली ओळख आहे.”कार्यक्रमात मयुरेश शिर्के यांनी नागरिकांनी या किल्ल्यांच्या जपणुकीसाठी पुढे यावं, असं आवाहन केलं. भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *