उमेदवारांच्या मागणीनंतर महापालिकेचा सकारात्मक निर्णय

डोंबिवली, ता. ०४ ( विशेष प्रतिनिधी) –
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध विभागांतील एकूण ४९० तांत्रिक व कार्मिक पदांची भरती सरळसेवा पद्धतीने करण्यात येत असून, या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आधी ३ जुलै २०२५ होती. मात्र इच्छुक उमेदवारांकडून मुदतवाढीच्या करण्यात आलेल्या विनंत्यांचा विचार करून महापालिका प्रशासनाने अर्ज करण्याची मुदत आता १५ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे. अशी माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली.

महापालिकेकडून अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावर नोकरभरती प्रक्रिया राबवली जात आहे. दिनांक १० जून २०२५ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून या भरतीबाबतची माहिती जाहीर करण्यात आली होती. यामध्ये विविध विभागांमधील तांत्रिक आणि कार्मिक पदांसाठी एकूण ४९० रिक्त जागा भरण्यात येणार असून, टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

शुक्रवार, ३ जुलै २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. मात्र, अनेक उमेदवारांकडून वेळेअभावी अर्ज नोंदवता आल्याबद्दल अर्जाची मुदत वाढवावी अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सकारात्मक निर्णय घेत अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे.

अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सांगितले की, ज्यांना वेळेअभावी अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी ही संधी महत्त्वाची आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी १५ जुलैपूर्वी अर्ज पूर्ण करून ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

अर्ज प्रक्रियेमध्ये अडचणी येणाऱ्या उमेदवारांनी महापालिकेच्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांक किंवा ई-मेल आयडीवर संपर्क करून मदतीची मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *