
डोंबिवली – अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, आज मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांनी ही सूत्रे स्वीकारली. यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपमधील शेकडो वरिष्ठ पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमात एवढी गर्दी झाली की, संपूर्ण आसनव्यवस्था भरल्यानंतर अनेकांना उभे राहूनच कार्यक्रम पाहावा लागला. वरळी डोममध्ये एवढ्या प्रमाणात कार्यकर्ते जमून घोषणाबाजी करत होते की, वातावरण पूर्णतः उत्सवमय झाले होते. या निवडीमुळे भाजपच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाजाला नवसंजीवनी मिळेल, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रविंद्र चव्हाण हे सध्या डोंबिवली मतदारसंघाचे आमदार असून, जानेवारी २०२५ पासून त्यांच्याकडे राज्य कार्याध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्याआधी त्यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस, मंत्री, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिकेचे नगरसेवक अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्याला सुरुवात करून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले चव्हाण आता थेट प्रदेशाध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत.विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काहीसे नाराज असलेल्या चव्हाण यांना दिलेले आश्वासन भाजप नेतृत्वाने पूर्ण करत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विशेषतः कोकणात भाजपचा कमकुवत असलेला प्रभाव वाढवण्यासाठी चव्हाण यांच्याकडून विशेष अपेक्षा व्यक्त होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या संघटनात्मक क्षमतेचे कौतुक करत, “कोकणात भाजपचा विस्तार घडवून आणण्यासाठी चव्हाण हे योग्य नेतृत्व आहे,” असे गौरवोद्गार काढले.मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याची गरज होती, आणि रविंद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. आजच्या निवडीमुळे तीच औपचारिक घोषणा झाली.भाजपच्या युवा मोर्चातून प्रवास सुरू करून आज प्रदेशाध्यक्षपदापर्यंत आलेले रविंद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांशी असलेले थेट नाते, संयमी स्वभाव, संघटनात्मक बांधणीतील कौशल्य आणि ठाम नेतृत्व हे पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्यावर पक्षाचे संघटन मजबूत करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.कार्यक्रमाच्या शेवटी चव्हाण यांनी “सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर उभा राहून भाजपला अधिक बळकट करू” असा निर्धार व्यक्त करत पक्षश्रेष्ठींचे आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले.नवे नेतृत्व, नवे संकल्प आणि नवचैतन्य… महाराष्ट्र भाजपसाठी एक नवा अध्याय सुरू झाल्याचे संकेत वरळी डोममधून स्पष्ट उमटले.
