डोंबिवली :

उघडकीस आलेल्या २ कोटींच्या अमलीपदार्थ तस्करी प्रकरणात मोठी कारवाई करत कल्याण झोन-३ च्या पोलिसांनी मुख्य आरोपी फरान याला हैदराबाद विमानतळावरून अटक केली आहे. फरान हा मुंबईत राहणारा असून, पोलिसांच्या रडारवर असतानाही तो चकवा देऊन फरार झाला होता. मात्र, तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला विमानतळावरच ताब्यात घेतले.या प्रकरणात यापूर्वी अखिल सुर्वे, मोहम्मद कुरेशी आणि महेक फातिमा रिजवान या तीन जणांना अटक करण्यात आली होती. पोलीस तपासात हे सर्व आरोपी एकाच ड्रग्स साखळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये फरान हा मुख्य सूत्रधार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. फरान सध्या कार्ड डीलिंगचा व्यवसाय करत असल्याचे वरपांगी दिसत होते, मात्र पोलीस तपासात त्याचा संबंध थेट ड्रग्स तस्करीशी असल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी मिळवलेल्या माहितीवरून फरान हा गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय होता. त्याचा उद्देश केवळ ड्रग्स पुरवठा करणे नव्हे, तर तो नव्या ग्राहकांना जाळ्यात ओढून ड्रग नेटवर्क वाढवत होता. दरम्यान, फरानने अनेक वेळा आपले वास्तव्य बदलले होते आणि बनावट ओळखींचा वापर करून पोलिसांची दिशाभूल केली होती.या चौघांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यांना ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासात या साखळीमागील बड्या मास्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी मिळवलेल्या मोबाईल, चॅट, आर्थिक व्यवहारांच्या पुराव्याच्या आधारे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही काही कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अमलीपदार्थांचे प्रमाण वाढले असून, शाळा-कोलेजातील तरुण वर्ग लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर कडक कारवाई करत पोलिसांनी या चौघांच्या अटकेमुळे मोठा पुरवठा साखळी उध्वस्त केल्याचा दावा केला आहे.पुढील काही दिवसात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता असून, पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *