
डोंबिवली — पावसाळा सुरू होताच डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. नागरिक त्रस्त झालेत, वाहनचालक हैराण झालेत, मात्र पालिकेचे ढिम्म प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे निष्क्रिय असल्याचं चित्र डोंबिवलीत दिसतंय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) आज डोंबिवलीत चांगलाच आवाज उठवत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं.आज सकाळी मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी डोंबिवलीच्या विविध मुख्य रस्त्यांवर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये थेट वृक्षारोपण केलं. पावसाळ्यात डोंबिवलीत खड्ड्यांचे जलतलाव निर्माण झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज डोंबिवलीकरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी ठोस शब्दांत पालिका प्रशासन आणि ठेकेदारांवर ताशेरे ओढले. “प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपयांची टेंडर काढली जातात. मात्र त्या कामांमध्ये कोणतीही गुणवत्ता राहत नाही.

ठेकेदार आणि पालिका अधिकारी एकमेकांच्या संगनमताने केवळ भ्रष्टाचार करतात,” असा थेट आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला.मनसेच्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली —“खड्ड्यांत वृक्षारोपण, पालिकेच्या निष्क्रियतेचा धिक्कार!”“जनतेचा जीव घेणाऱ्या खड्ड्यांना कायमची समाधी द्या!”“डागदोजी पुरे झाला, कायमस्वरूपी रस्ते द्या!”यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी पालिका प्रशासनाला थेट इशारा दिला की, “ताबडतोब शहरातील खड्डे बुजवावेत, अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र स्वरुपाचं आंदोलन राबवलं जाईल. केवळ खड्डे बुजवण्याचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसिद्धी करायची आणि प्रत्यक्षात पुन्हा खड्डे उघडेच ठेवायचे हा पालिकेचा शिरस्ता यंदा चालणार नाही,” असा सज्जड दम भरला.दरम्यान, नागरिकांकडूनही मनसेच्या या आंदोलनाचे समर्थन करण्यात येत आहे. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून पालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत मनसेच्या आंदोलनाचे स्वागत केले. “आता खरंच खड्ड्यात झाडं लावण्याची वेळ आलीय, कारण पालिकेला लोकांचे प्राण किंमतीचे वाटतच नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून येतेय.डोंबिवलीतील रस्त्यांची दुरवस्था वर्षानुवर्षे सुरूच आहे. निवडणुकीआधी आश्वासनं देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडणुकीनंतर मात्र कानाडोळा केल्याची नागरिकांची भावना आहे. त्यामुळे आता खड्ड्यांमध्ये झाडं लावून खड्ड्यांवर लक्ष वेधण्याचा मनसेचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.मनसेने आंदोलनाद्वारे पुन्हा एकदा ठणकावून सांगितलंय —”आम्ही झाडं लावलीत, उद्या एखादा आंदोलनाच्या वेळी आमचं रोपटी उखडून टाकायचं काम पालिका प्रशासन करेल पण लक्षात ठेवा, यंदा खड्ड्यांच्या मुद्द्यावर आम्ही माघार घेणार नाही.”आता डोंबिवलीकरांचे प्रश्न सुटणार का? की पुन्हा खड्ड्यातच जनतेचा प्रवास सुरू राहणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
