
डोंबिवली : डोंबिवली परिसरातील ६५ बेकायदा इमारतींमध्ये राहणारे शेकडो रहिवासी आज सकाळी ९ वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत. आपल्या छतावर आलेल्या संकटावर तोडगा काढण्यासाठी हे रहिवासी सरकारकडे आर्जव करणार आहेत. मागील काही महिन्यांपासून डोंबिवलीत अनधिकृत इमारतींच्या कारवाईचा मुद्दा गाजत आहे.

अनेक इमारतींवर तोडक कारवाईचे आदेश लागले असून त्यामुळे हजारो कुटुंबांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रहिवाशांनी म्हटले की, आम्ही आमचे घर विकत घेताना संपूर्ण पैसे भरले आहेत, मग चुकीचे परवाने, बनावट कागदपत्रे याला जबाबदार आमच्यासारखा सामान्य माणूस का ठरवला जातो? बांधकाम व्यावसायिकांनी आमच्याकडून लाखो रुपये उकळले आणि आज आम्हाला बेघर होण्याची भीती भेडसावत आहे. शासनाने या परिस्थितीत आम्हाला संरक्षण द्यावे, आमच्या घरांचे संरक्षक धोरण तयार करावे अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे.रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत महापालिका आणि टाउन प्लॅनिंग विभागाकडून बेकायदा इमारतींवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. यामुळे घराचे हक्काचे स्वप्न पाहिलेल्या कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. आमच्याशी कोणतीही चर्चा न करता थेट कारवाई करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.आजच्या धरणे आंदोलनात महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळणार आहे. सरकारने आमच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की सरकारने निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
