
डोंबिवली; २४ ( विशेष प्रतिनिधी)-
ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नुकताच कल्याण तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी, कल्याण कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात आय.डी.बी.आय. बँक लिमिटेड यांच्या सी.एस.आर. निधीतून कल्याण तालुक्यातील काही शाळा तसेच शासकीय रुग्णालयांना संगणक, प्रिंटर आणि टॅब चे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून बँकेने समाजाच्या उन्नतीसाठी उचललेल्या पावलांचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अशा सामाजिक उपक्रमांमुळे शैक्षणिक व आरोग्य सेवा अधिक सक्षम बनण्यास मदत होते.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी हरिष पाटील, कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, आय.डी.बी.आय. बँकेचे मुख्य व्यवस्थापक रंजनकुमार रथ, ठाणे विभाग व्यवस्थापक रंजन कन्हैया तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.यानंतर जिल्हाधिकारी शिनगारे यांनी कल्याण उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि लोकहितार्थ सेवा अधिक गुणवत्तापूर्वक देण्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यालयीन आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी शिनगारे यांनी कल्याण तहसील कार्यालयालाही भेट देऊन प्रशासनाच्या कार्याचा आढावा घेतला.

—
