माजी नगरसेवक, पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे लक्ष देईल का ?

डोंबिवली : पूर्वेतील खांबालपाडा येथील मॉडेल कॉलेज समोरील मोकळया मैदानात अनधिकृत भंगार विक्रेत्यांकडून दररोज खुलेआमपणे प्लास्टीक जाळले जात आहे. प्लास्टीक जळाल्याने या परिसरात मोठया प्रमाणात धुराचे प्रदूषण होत असल्याने स्थानिक रहिवाशी हैराण झाले आहेत. धुराच्या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले असून, मानपाडा पोलीस प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण विभाग याकडे लक्ष देईल का ? असाच प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

डोंबिवली पूर्वेतील खंबालपाडा परिसरात अनेक रासायिनक कंपन्यांचे प्रदूषण सुरू असतानाच मॉडेल कॉलेज समोरील मोकळया मैदानात अनधिकृत भंगार व्यवसाय सुरू आहे. भंगार विक्रेत्यांकडून या ठिकाणी दररोज प्लास्टीक आणि टाकाऊ पदार्थ जाळले जातात. यामुळे परिसरात मोठया प्रमाणात धुराचे लोट पसरतात. आजूबाजूच्या परिसरात मोठया प्रमाणात लोकवस्ती असून, कॉलेजही आहे. धुराच्या प्रदूषणामुळे लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व स्थानिक रहिवाशांना खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. खंबालपाडा परिसरात रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त असतानाच आता वाढत्या धुराच्या प्रदूषणामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

एकिकडे कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. तर दुसरीकडे धुराच्या त्रासामुळे नागरिकांना खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे स्थानिक माजी नगरसेवक, पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेही जाणीवपूर्णक दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अनधिकृत भंगार विक्रेत्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी वाढत्या प्रदूषणातून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *