मुंबई (विशेष प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) संघटनात्मक फेरबदल करत राजकीय पटलावर महत्त्वाची खेळी खेळली आहे. सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी, तर युवा आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी आज अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आणि खासदार पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी दोघांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी हे दोघेही खा. पार्थ पवार यांचे अत्यंत निकटवर्ती शिलेदार मानले जातात. दीर्घकाळ रिक्त असलेल्या या दोन महत्त्वाच्या पदांवर दोघांची झालेली वर्णी ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाची आणि पक्षाच्या नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवण्याच्या रणनीतीची थेट नांदी मानली जात आहे.

मुंबईत अल्पसंख्याक व तरुण मतदारांना आकर्षित करण्याची रणनीती

बाबा सिद्दीकी यांच्या वारशाचा राजकीय फायदा आणि वांद्रे पूर्व भागातील आमदारकीचा अनुभव असलेल्या झिशान सिद्दीकी यांच्या नियुक्तीमुळे मुंबईत पक्षाला अल्पसंख्याक आणि तरुण मतदारांशी थेट संवाद साधता येईल. मुंबई महानगरपालिकेत पक्षाची घसरलेली पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी सिद्दीकी यांच्याकडे ‘मास्टरकार्ड’ म्हणून पाहिले जात आहे.

दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जनसेवेचा आणि विकासाचा वारसा पुढे नेत पक्षसंघटना सर्वसमावेशक व बळकट करण्याची जबाबदारी या दोन्ही तरुण नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी काही मोठे संघटनात्मक बदल आणि नवीन समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *