ठाणे : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहिम राबविणा-या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका भाजी विक्रेत्याने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज संध्याकाळी ठाण्यात घडली. या हल्ल्यात त्यांच्या हाताची दोन बोट छाटली असून त्यांच्या सुरक्षा रक्षकाचेही बोट तुटले आहे. अमरजित यादव वय ४५ असे हल्लेखोर भाजीविक्रेत्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तीन वर्षापूर्वी याच अमजित यादववर हल्ल्याचा गुन्हा दाखल होता. ठाण्यातील हि पहिलीच घटना नाही, यापूर्वीही फेरीवाल्यांनी पालिका अधिका-यांवर जीवघेणे हल्ले केले आहेत त्यामुळे ठाण्यात फेरीवाल्यांची दादागिरी कधी मोडून काढणार ? असाच सवाल उपस्थित हेात आहे.
ठाणे महापालिकेकडून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहिम सुरू आहे. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे या पथकासह घोडबंदर भागातील कसारवडवली येथील मार्केटवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी फेरीवाल्यांनी त्यांच्या कारवाईला विरोध केल्याने फेरीवाले विरूध्द पालिका कर्मचारी असा संघर्ष झाला, याचवेळी अमरजित यादव या भाजी विक्रेत्याने रागाच्या भरात पिंगळे यांच्यावर चाकू फेकून मारला पिंगळे यांनी तो हल्ला रोखण्यासाठी हाताने अडवला पण त्यात त्यांची तीन बोटं छाटली गेली. त्यांना वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षकाने धाव घेतली असता आरोपी यादवने त्यांच्यावरही वार केला या हल्ल्यात त्यांचे बोटही तुटले. जखमी पिंगळे व त्यांच्या सुरक्षा रक्षकांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर यादवला पोलिसांनी अटक केली असली तरी फेरीवाल्यांची मुजोरी समोर आली आहे.


