ठाणे, दि. १ (प्रतिनिधी) : कोरोना आपत्तीच्या काळात तब्बल पाच लाख रुपयांची लाच घेणारे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी राजू मुरूडकर यांना ठाणे महापालिकेने पुन्हा सेवेत घेतले आहे. भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेऊन महापालिका आयुक्तांनी ठाण्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाची भेट दिली आहे का, असा सवाल भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत काही वर्षांपूर्वी एका लाचखोर कार्यकारी अभियंत्याला तब्बल पाच वर्ष सेवेत घेण्यात आले नव्हते. तर अतिरिक्त महापालिका आयुक्त दर्जाचा अधिकारी चार वर्ष उलटल्यानंतरही सेवेत परतू शकलेला नाही. एकीकडे कल्याण महापालिकेत अशी स्थिती असताना, ठाणे महापालिकेत भ्रष्ट डॉ. राजू मुरुडकर यांच्यासाठी `रेड कार्पेट’ अंथरण्यामागे कोण आहे, असा सवालही वाघुले यांनी केला आहे.
कोरोना आपत्तीच्या काळात ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. राजू मुरुडकर यांना नियुक्ती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी व्हेंटिलेटर पुरविण्याचे काम देण्याच्या बदल्यात १५ लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर डॉ. मुरुडकर यांना पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने त्यांना निलंबित केले होते. आता वर्षभरानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले असून, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पदस्थापना देण्यात आली आहे.
या प्रकाराला भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी आक्षेप घेतला आहे. कोरोना आपत्तीच्या काळात सामान्यांची फरफट होत होती. त्याकाळात जनतेला सेवा देण्याऐवजी डॉ. मुरुडकर यांनी लाच घेतली होती. त्यांची ही वृत्ती म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. अशा अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेऊन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी काय साध्य केले. भ्रष्ट डॉ. मुरुडकर यांना सेवेत घेऊन ठाणेकरांना आयुक्तांनी महाराष्ट्र दिनाची भेट दिली आहे का, असा सवाल माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे.
