डोंबिवली :
कल्याण-डोंबिवली तसेच ग्रामीण भागातील नागरी समस्या आणि तक्रारींचे त्वरित निराकरण व्हावे या उद्देशाने भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील भाजपा कल्याण ग्रामीण कार्यालय येथे ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला.
या दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपापल्या समस्या मांडल्या. एकूण ९८ तक्रारींमध्ये ६८ लेखी निवेदने तर ३० मौखिक तक्रारी नोंदविण्यात आल्या. प्रदेशाध्यक्षांचे स्वीय साहाय्यक संतोष साखरे यांनी नागरिकांकडून निवेदने स्वीकारली. यातील काही विषयांचे तात्काळ निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींवर संबंधित विभागांमार्फत लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली शहरात वाढता पाणी प्रश्न, पावसाळ्यात घरात शिरणारे पाणी, कल्याण-शील रस्त्यावरची वाहतूक कोंडी, बीएससीपी प्रकल्पातील घरांचा प्रश्न, यांसह इतर नागरी समस्यांवर नागरिकांनी ठोस मागण्या केल्या. या समस्या थेट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमदार रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या.
जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना थेट आपले प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे काही तक्रारींचे निराकरण तत्काळ करून प्रशासनाने तत्परता दाखवली.
या वेळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, मंडल अध्यक्ष धनाजी पाटील, कर्ण जाधव, मितेश पेणकर, प्रशांत चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवलीतील नागरी समस्यांची व्याप्ती मोठी असली तरी अशा जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासनाशी नागरिकांचा थेट संपर्क साधला जात असल्याने अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
