
कल्याण | प्रतिनिधी –भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यासाठी आजचा दिवस मोठा झटका देणारा ठरला आहे. कल्याणमध्ये झालेल्या महेश गायकवाड गोळीबार प्रकरणात उच्च न्यायालयाने गणपत गायकवाड, हर्षल केने, कुणाल पाटील आणि एका अन्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे या प्रकरणात गुन्हेगारी कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.ही घटना उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली होती.या प्रकरणातील काही आरोपींना याआधी न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मात्र, माजी आमदार गणपत गायकवाड, त्यांचे निकटवर्तीय हर्षल केने आणि कुणाल पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे हे तिघे आणि अन्य एक आरोपी सध्या तळोजा कारागृहातच राहणार आहेत.विशेष म्हणजे, या प्रकरणात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला तपास यंत्रणांनी क्लीन चीट दिली आहे. त्याचे नाव अंतिम चार्जशीटमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे तो या प्रकरणातून बाहेर पडला असला, तरी त्याचे वडील अजूनही तुरुंगातच आहेत.
