डोंबिवली, २९ जुलै :डोंबिवलीतील म्हात्रे नगर परिसरात नागपंचमीच्या दिवशी एक अद्भुत आणि परंपरेला साजेसा प्रसंग अनुभवायला मिळाला. इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हात्रे कुटुंबाच्या घरी नागदेवतेने चमत्कारिक रूपात दर्शन दिले. विशेष बाब म्हणजे पूजा, आरती आणि ओवाळणी होईपर्यंत नागदेवता आपल्या जागी स्थिर राहिल्या आणि फणा काढून उपस्थित राहिल्या.संपूर्ण कार्यक्रमादरम्यान नागदेवतांनी हार, फुलं, हळद-कुंकू लावतानाही काहीही हालचाल केली नाही. हे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. स्नेह, श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेली ही घटना अनेकांच्या मनाला भावून गेली.या घटनेत आणखी विशेष लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे सर्पमित्र सुभाष म्हात्रे यांचे योगदान. ते गेली ८७ वर्षे सिमेंटच्या जंगलात (शहरी परिसरात) साप पकडून ते पुन्हा निसर्गात झाडांच्या जंगलात सुरक्षित सोडतात. विशेषतः नागपंचमीच्या दिवशी ते पकडलेले साप घरी आणतात आणि त्यांची काळजी घेतात. पूजा होईपर्यंत हे सर्प काहीही हालचाल करत नाहीत, उलटपक्षी शांततेने पूजा स्वीकारतात.घरातील सदस्य आणि आजूबाजूचे रहिवासी मोठ्या भक्तीभावाने या नागदेवतांची पूजा करतात. वर्षानुवर्षे हे दृश्य पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही एक आध्यात्मिक आणि भावनिक परंपरा बनली आहे. नागदेवता आपल्या उपस्थितीने ही परंपरा प्रत्येक वर्षी अधिक पवित्र करतात, असे म्हात्रे कुटुंबीय सांगतात.संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा असून, श्रद्धाळूंसाठी हा एक आस्था जागवणारा अनुभव ठरत आहे. विज्ञान आणि श्रद्धेच्या सीमेवर असलेल्या या प्रसंगाने डोंबिवलीकरांचे लक्ष पुन्हा एकदा या जुन्या परंपरेकडे वळवले आहे.
