डोंबिवली;- २३ ( विशेष प्रतिनिधी):
कल्याणमधील तरुणीला मारहाणीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले असून या घटनेचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश नागरी विकास सेलचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक नवीन सिंग यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली असून, राज्यात वाढत चाललेल्या भाषावाद व प्रांतवादावर थेट कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

सिंग म्हणाले की, “या घटनेच्या निमित्ताने काही राजकीय पक्ष मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद उभा करत आहेत. यातून जर दंगली उसळल्या तर त्याचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस प्रशासनाने अशा वाद निर्माण करणाऱ्या कोणत्याही पक्षावर त्वरित आणि कठोर कारवाई केली पाहिजे.” या प्रकरणावरून अनेक राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडली असून, मनसे, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे कल्याण-डोंबिवलीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच “मराठी तरुणांवर होणाऱ्या हल्ल्यांना खपवून घेतले जाणार नाही”, असा इशाराही दिला आहे.

काँग्रेस नेते नवीन सिंग यांनी मात्र यामध्ये राजकारण थांबवण्याचे आवाहन केले आहे. “एकीकडे मराठी, दुसरीकडे परप्रांतीय असा संघर्ष निर्माण करणे हे अत्यंत धोकादायक आहे. व्हिडिओ खरे आहेत की खोटे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर फेक व्हिडिओ तयार करून समाजात तेढ निर्माण केली जात असेल तर अशांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.

सिंग पुढे म्हणाले, “मी स्वतः डोंबिवलीत राहतो. मराठी भाषेवर माझं प्रेम आहे. महापालिकेच्या सभागृहात मी मराठीतूनच बोलतो. मी हिंदी भाषिक असूनही मला मराठी येते, आणि मला महाराष्ट्राची संस्कृती आवडते. माझी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना – मराठी आणि हिंदी भाषिकांना विनंती आहे की आपण प्रथम भारतीय आहोत. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा शिकणं ही आपली जबाबदारी आहे. आपण सर्व एक आहोत.” तसेच या प्रकरणात कायदेशीर कारवाईसोबतच सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी सर्व पक्षांनी जबाबदारीने वागावे, असे सांगून नवीन सिंग यांनी भाजपनेही या प्रकरणात राजकारण करू नये, असा सल्ला दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *