
डोंबिवली — ओला आणि उबर चालकांनी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी बुधवारी डोंबिवलीत ठिय्या आंदोलन करत एकदिवसीय बंद पुकारला. डोंबिवली पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या चालकांनी सरकार आणि ओला-उबर कंपन्यांच्या मनमानी विरोधात संताप व्यक्त केला. कमी भाडेदर, जादा कमिशन आणि सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे उपजीविकेवर गदा आली असून आता उपासमारीची वेळ ओढवली असल्याची व्यथा त्यांनी मांडली.प्रत्येक प्रवासानंतर कमी दर मिळतो, मात्र त्यातून इंधन, गाडीची देखभाल, कंपन्यांचे जास्तीचे कमिशन आणि कर भरल्यानंतर हाती काहीही राहत नाही, अशी तक्रार चालकांनी केली. कंपन्यांनी कमी केलेले दर आणि वाढलेले कमिशन यामुळे ईएमआय भरताना अडचणी निर्माण होत आहेत. महागाई वाढत असताना ओला-उबर कंपन्या आमचा सरळ शोषण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.मुंबईत १५ जुलैला सुरू झालेल्या संपाची धग आता डोंबिवलीपर्यंत पोहोचली असून, या आंदोलनात कल्याण-डोंबिवलीमधील सर्वच ओला-उबर चालक सहभागी झाले आहेत. त्यांची मुख्य मागणी म्हणजे प्रवासाचा दर सरकाच्या नियमानुसार निश्चित करणे, कमिशनचा दर कमी करणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे.ओला-उबर चालकांनी केंद्र सरकारकडे निवेदन देत समस्या मांडल्या असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
