डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र या स्पर्धांमध्ये नियोजनाचा पूर्ण अभाव असून अनेक त्रुटी वर्षानुवर्षे सुरूच आहेत. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद मदन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने गुरुवारी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.

यावेळी मनवीसे शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे उपशहराध्यक्ष सुहास काळे, विभागाध्यक्ष करण काठे, सचिव निखिल जोशी, महाराष्ट्र सैनिक गणेश यादव हे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या क्रीडा स्पर्धांसाठी डीएसओच्या माध्यमातून विशेष निधी मंजूर केला जातो. मात्र त्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी वेळेवर होत नाही. अनेकवेळा एकाच दिवशी अनेक खेळांची स्पर्धा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांना संधीच मिळत नाही.शहरातील टिटवाळा ते डोंबिवलीपर्यंतच्या शाळांतील विद्यार्थ्यांना थेट मुंब्रा येथे पाठवले जाते, तेही सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास करावा लागतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खेळांचे साहित्यही अपुरे आहे. टिटवाळ्यात फुटबॉल स्पर्धेत नियोजनाच्या अभावामुळे शाळांना परत जावे लागले होते. प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना फिजिकल स्वरुपात मिळत नसून ऑनलाईन पीडीएफ दिली जाते.या सर्व समस्यांवर आयुक्त अभिनव गोयल यांच्याशी चर्चा करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली असून आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मनसेने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *