कसारा : कसारा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला असून तिकीट तपासणीच्या बहाण्याने रेल्वेच्या तिकीट तपासक (टीसी) रमेशकुमार शर्माने एका ७ वर्षाच्या चिमुरडीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने थेट उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.ही घटना १२ जून रोजी घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसारा लोकलने आलेल्या माय-लेकांनी स्थानकात उतरल्यानंतर संबंधित टीसीने महिलेला तिकीट विचारले. महिला आपल्या पर्समधून तिकीट काढत असताना रमेशकुमार शर्माने तिच्या सोबत असलेल्या ७ वर्षांच्या मुलीला जवळ ओढत अश्लील स्पर्श केल्याचा आरोप आहे.तक्रार दाखल होताच उपमुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने याची दखल घेतली. कल्याण रेल्वे पोलिसांना तत्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले. पोलिसांनी पीडित महिलेशी संपर्क साधून आरोपी टीसी रमेशकुमार शर्मा याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे कल्याण रेल्वे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणामुळे रेल्वे स्थानकातील महिला व लहान मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांकडून होत आहे.
