गिर्यारोहणासोबत सामाजिक कार्यातही मॅडचे भरीव योगदान; राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव

डोंबिवली, दि. 14 (प्रतिनिधी):
डोंबिवलीतील माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली (मॅड) या संस्थेला यंदाचा प्रतिष्ठेचा ‘गिरीमित्र’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. गिर्यारोहण क्षेत्रातील हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे. मुंबईतील मुलुंड येथे महाराष्ट्र सेवा संघात झालेल्या २२ व्या गिरीमित्र संमेलनात सुप्रसिद्ध गिर्यारोहक लक्पा नोर्बु शेर्पा यांच्या हस्ते मॅड संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली ही संस्था १९८५ सालापासून गिर्यारोहण क्षेत्रात सक्रिय आहे. या संस्थेने आजवर असंख्य गड-किल्ले मोहिमा, हिमालयीन मोहिमा तसेच विविध वयोगटांतील साहसी शिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. केवळ गिर्यारोहणच नव्हे तर सामाजिक कार्यातही मॅडने महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे.

मॅड संस्थेने श्रीमलंगगड रेस्क्यू ऑपरेशन, रक्तदान शिबिरे, किल्लारी व भूज भूकंपग्रस्तांना वैद्यकीय मदत, 2021 मध्ये महाडमधील पूरग्रस्त घरांची साफसफाई अशी अनेक सामाजिक कामगिरी केली आहे.याशिवाय संस्था दरवर्षी प्रस्तरारोहण शिबिरे, पावसाळ्यात वॉटरफॉल रॅपलिंग यांसारख्या साहसी उपक्रमांचे आयोजन करते.
हिमालयातील अवघड शिखरांची यशस्वी मोहीम
मॅड संस्थेने हनुमान टिब्बा, लडाखी, शीतीधर, फ्रेंडशिप, व्हाइट सेल, केदारदोम, जोगिन, श्रीकैलास, स्टॉक कांगरी, कांग यात्से, विधान पर्वत, कामेट, अबिगमिन अशा हिमालयातील अनेक कठीण शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. याशिवाय व्हॅली ऑफ फ्लॉवर, मारखा व्हॅली यांसारख्या ट्रेकचेही आयोजन संस्थेने केले आहे.
विविध उपक्रमांतून सामाजिक भान
यावर्षी जानेवारीमध्ये संस्थेने लेह चादर ट्रेक, सप्टेंबरमध्ये सतोपंथ ट्रेक आयोजित केला. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग प्रतिकृती, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, मोडी लिपी पत्रांचे जतन, वट पौर्णिमेनिमित्त फळझाडांचे वाटप, आदिवासी विभागातील गरजूंना कपड्यांचे वाटप, शहापूरजवळ साकडबाव येथे वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवले.

मॅड संस्थेला मिळालेला ‘गिरीमित्र’ पुरस्कार ही संस्था आणि डोंबिवली शहरासाठी गौरवाची बाब आहे. या सन्मानाबद्दल मॅडच्या पदाधिकारी आणि सदस्यांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
