कल्याण : मुदतबाह्य, उरलेली व न वापरलेली औषधे ही पर्यावरण आणि समाज आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याने त्याचा शास्त्रीय पद्धतीने निपटारा करण्यासाठी ‘टेकबॅक’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमामागे महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची संकल्पना आहे – “पर्यावरण वाचवूया, औषधांचा गैरवापर टाळूया!”केंद्र सरकारच्या स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने मे महिन्यात सर्व राज्यांच्या औषध नियंत्रकांना मुदतबाह्य तसेच न वापरलेल्या औषधांच्या विल्हेवाटीसंदर्भात परिपत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने औषधांचा योग्य निपटारा करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.या मोहिमेअंतर्गत, महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनकडून राज्यातील प्रत्येक केमिस्टकडे ‘ग्रीन ड्रॉप बॉक्स’ ठेवण्यात येणार आहे. ग्राहकांनी घरी साठवलेली, कालबाह्य किंवा न वापरलेली औषधे या बॉक्समध्ये जमा करावीत, असे आवाहन संघटनेने केले आहे.अशा औषधांची रस्त्यावर, कचऱ्यात वा गटारात विल्हेवाट लावल्यास ती प्रदूषणास कारणीभूत ठरतात आणि मानवासह इतर सजीवांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर ‘बायो वेस्ट’ यंत्रणेद्वारे या औषधांची योग्य विल्हेवाट लावली जाणार आहे.कल्याण शहरातील सुमारे ८०० व ठाणे जिल्ह्यातील जवळपास ५००० मेडिकल दुकाने या उपक्रमात सहभागी होणार आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरणपूरक आणि जनहितार्थ पाऊल ठरणार आहे.शिंदे यांनी सांगितले की, “हा उपक्रम केवळ पर्यावरणरक्षणासाठी नाही, तर औषधांचा गैरवापर टाळण्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *