कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मंगळवारी डोंबिवली शहरात ‘जनता दरबार’ घेतला. या दौऱ्यानिमित्त प्रशासनाने डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवून फेरीवाल्यांना तातडीने हटवले होते. स्थानक परिसर, पुलाखालील जागा, तसेच मुख्य रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमण हटवून परिसरात शिस्त लागू करण्यात आली होती. परंतु आयुक्तांचा दौरा संपताच केवळ २४ तासातच पूर्वीसारखी परिस्थिती परत आली असून, फेरीवाल्यांनी पुन्हा त्याच जागांवर आपली दुकाने थाटल्याचे दिसून येत आहे.बुधवारी सकाळपासून डोंबिवली स्थानकाच्या पूर्व व पश्चिम भागात पादचाऱ्यांसाठी असलेल्या रस्त्यावर फेरीवाल्यांचे बस्तान पुन्हा उभे राहिले. यामुळे सामान्य नागरिकांना चालणे कठीण झाले असून वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी महापालिकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. “आयुक्त येतात तेव्हाच फेरीवाले हटवले जातात, पण नंतर प्रशासन दुर्लक्ष करते,” अशी प्रतिक्रिया अनेक स्थानिकांनी दिली.या प्रकारामुळे महापालिकेच्या कारवाईवर आणि त्याच्या सातत्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी प्रशासनाकडे ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. “फक्त आयुक्तांच्या भेटीनंतरची एकदिवसीय कारवाई उपयोगाची नाही, तर कायमस्वरूपी उपाय हवा,” असा सूर जनतेतून उमटतो आहे.फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सुसंगत धोरण आणि नियमित कारवाई न झाल्यास डोंबिवलीकरांना दररोज त्रास सहन करावा लागणार हे स्पष्ट आहे.
