
डोंबिवली | प्रतिनिधी – मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसाच्या अस्तित्वावर गदा येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व मराठी एकीकरण समितीने थेट पोलिस प्रशासनावर निशाणा साधला आहे. मराठीसाठी लढणाऱ्या या संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हे प्रकरण अधिकच गडद होत चालले आहे.डोंबिवलीत पत्रकार परिषद घेत मनसेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. “मराठी भाषिकांचा मोर्चा शांततेने सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांना अडवणे, ताब्यात घेणे, हे पूर्णपणे अनावश्यक होते. हा सरळसरळ दबावाचा प्रकार आहे,” असे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी ठामपणे सांगितले.या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हाअध्यक्षा दीपिका पेडणेकर, डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी यावेळी म्हटले की, “मीरा-भाईंदरमध्ये हिंदी भाषेला पुढे करण्यासाठी दिल्लीहून दबाव आहे. त्यामुळे मराठी भाषेची गळचेपी सुरू आहे. आम्ही याला विरोध केला म्हणून पोलिसांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.”डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांनी राज ठाकरे यांचे वक्तव्य उद्धृत करत सांगितले, “आमची सत्ता रस्त्यावर आहे आणि आम्ही लोकांच्या हक्कासाठी लढायला तयार आहोत.”जिल्हाअध्यक्ष दीपिका पेडणेकर यांनी देखील आक्रमक भूमिका घेत, “जर मराठी माणसाच्या हक्कांबाबत प्रशासन असं वागत असेल, तर आम्ही मीरा-भाईंदर गाठणारच. अशा वेळी शांत बसायचं नाही,” असे ठाम सांगितले.
