डोंबिवली : जवळील निळजे गावात ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या एका परदेशी तस्कराला मानपाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल दीड किलो मॅफेड्रोन (एमडी) ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या अंमली पदार्थाची बाजारमूल्य सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक आहे.बातमी:डोंबिवली निळजे परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीजवळ एक परदेशी इसम एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी निळजे गावातील तलावाजवळ सापळा रचत गस्त वाढवली. यावेळी पोलिसांना एका इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या जवळील बॅगेची झडती घेतली असता पोलिसांना तब्बल 1 किलो 51 ग्रॅम मॅफेड्रोन ड्रग्स आढळले.ही ड्रग्सची किंमत सुमारे 2 कोटी 12 लाख रुपये असून, पोलिसांनी आरोपी इसा बकायोका या परदेशी नागरिकाला तात्काळ अटक केली आहे. प्राथमिक तपासात इसा हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असून तो सध्या डोंबिवलीतील निळजे गावात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे.इसाने हे ड्रग्स कुठून आणले, त्याचे नेटवर्क कोणत्या पातळीवर पसरले आहे, आणि तो कोणाला ही ड्रग्स विकणार होता, याचा तपास मानपाडा पोलिसांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, आठवडाभरापूर्वीच खोणी परिसरातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत पोलिसांनी छापा टाकून दोन कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले होते. त्या प्रकरणात चौघांना अटक झाली होती, त्यात एका महिलेचाही समावेश होता.या सलग कारवायांमुळे डोंबिवलीत ड्रग्स तस्करीचं आंतरराष्ट्रीय जाळं असल्याची शक्यता अधिक बळकट झाली असून, पोलिसांनी या नेटवर्कमधील इतर साथीदारांचा शोध सुरू केला आहे. या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे कल्याण विभागाचे उपायुक्त अतुल झेंडे यांनी स्पष्ट केलं की, “डोंबिवली परिसरातील आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्क उघड करण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून, अशा अवैध कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
