शिळफाटा रस्त्यावरील काटई-निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे रस्ता महत्त्वाचे काम अद्याप अपूर्ण असताना, केवळ उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या पुलाचे घाईघाईने उद्घाटन केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. या गैरजबाबदार कृतीमुळे प्रवाशांच्या जिविताला थेट धोका निर्माण झाला असल्यामुळे, संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हेगारी कट आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे सोमवारी लेखी निवेदनाद्वारे केली.पलावा चौक भागातील प्रचंड वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल वाहतुकीस लवकर सुरू होणे गरजेचे होते, मात्र या पुलाच्या गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची खातरजमा करण्याऐवजी, एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) अधिकारी आणि कंत्राटदाराने कोणतीही स्पष्टता न देता पुलाचे उद्घाटन केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. “या पुलाचे वास्तू काम पूर्ण झाले असले तरी मास्टिक अस्फाल्टचा समतल थर टाकण्याचे काम सुरूच होते. अशा अवस्थेत पूल सुरू करणे म्हणजे निष्काळजीपणाचे उत्तम उदाहरण आहे,” असे ते म्हणाले.उद्घाटनानंतर काही मिनिटांतच काही दुचाकीस्वार घसरून पडले आणि काही नागरिक जखमीही झाले. हे अपघात पुलावरच्या अपूर्ण आणि निसरड्या रस्त्यामुळेच घडले, हे नागरिकांनीही अधोरेखित केले. दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर असून, एमएसआरडीसीने कंत्राटदाराकडून पुलाचे “वाहतुकीसाठी योग्य” असल्याचे प्रमाणपत्र घेतले होते का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या संपूर्ण प्रकरणात एमएसआरडीसीचे अधिकारी, पूल उभारणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी आणि शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे व इतर पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.सद्यस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य न देता राजकीय श्रेयासाठी घेतलेले हे पाऊल प्रशासनाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ नियोजनाची साक्ष देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *