डोंबिवली मधील ‘हम चॅरिटेबल ट्रस्ट’*ने जम्मू-काश्मीरमधील युद्धग्रस्त कुटुंबांना दिलासा देणारी मदत दिली असून, “हम साथ साथ है” असा बुलंद संदेश दिला आहे. अवघ्या एका महिन्यात नियोजनबद्ध रितीने २५ लाख रुपयांचा निधी संकलित करून ११२ कुटुंबांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे.२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यावर ७ मे रोजी भारत सरकारकडून करण्यात आलेल्या *‘ऑपरेशन सिंदूर’*नंतर जम्मू-काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये सीमावर्ती भागांतील अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ही भयावह परिस्थिती पाहून ‘हम’च्या कार्यकर्त्यांनी २२ मे रोजी प्रत्यक्ष पाहणीसाठी जम्मू कडे प्रस्थान केले आणि राजौरी, पूंछ, नौशेरा, उरी, सलमाबाद, लगामा या भागांची पाहणी केली.या पाहणीनंतर अंदाजे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे निष्पन्न झाले. डोंबिवली, कल्याण, भांडुप, पुणे, ठाणे, मुंबई, भिवंडी, बेंगळुरू, हैदराबाद तसेच अमेरिका व कॅनडातील देणगीदारांनीही या मोहिमेला भरघोस साथ दिली. ट्रस्टचे ट्रस्टी अक्षय फाटक यांच्या सहकार्याने एक डिजिटल पेमेंट लिंक तयार करून संपूर्ण मोहिम पारदर्शकपणे राबवण्यात आली.या मदतीतून घरांचे नुकसान झालेलेल्या ११२ कुटुंबांना त्यांच्या बँक खात्यावर थेट निधी जमा करण्यात आला. त्यातील काही कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून धनादेश देखील देण्यात आले. जयंत पित्रे, . सुनिल देशपांडे आणि मनोज नशिराबादकर यांनी प्रत्यक्ष जाऊन मदत पोहोचवली. यासोबतच युद्धकाळात नागरिकांना आसरा दिलेल्या लागमाच्या गुरुद्वाऱ्याला २५,००० रुपयांची मदतही देण्यात आली.पावसाळ्यापूर्वीच मिळालेली ही मदत कोसळलेल्या घरांबरोबरच खचलेली मनेही उभी करेल, असा विश्वास ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुनिल देशपांडे यांनी व्यक्त केला. “जोडो जम्मू काश्मीर” या उद्दिष्टाच्या दिशेने लोकसहभागातून साधलेले हे यश, माणुसकीच्या विजयाची साक्ष देणारे ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *