
डोंबिवली :
डोंबिवली पूर्वेतील आजदेपाडा येथील साई दर्शन इमारतीत मध्यरात्री घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाच्या घराला अज्ञात व्यक्तीने बाहेरून टाळा मारल्यामुळे संपूर्ण कुटुंब घरात अडकले. सकाळी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न असफल ठरल्यानंतर ही बाब उघडकीस आली.ही घटना रवींद्र काटे यांच्या कुटुंबासोबत घडली असून, घरातील महिला व लहान मुलांमध्ये घबराट पसरली होती. शेजाऱ्यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस पथक आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दरवाज्यावरील टाळा तोडून कुटुंबाची सुखरूप सुटका केली.ही घटना घडली त्यावेळी संपूर्ण कुटुंब झोपेत होते. सकाळी दरवाजा उघडता न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक दिली. यानंतर दरवाजावर बाहेरून टाळा असल्याचे लक्षात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. शेजारी व स्थानिक रहिवाशांकडून माहिती घेतली जात आहे. या मागे वैयक्तिक वाद, धमकी किंवा अन्य कोणता हेतू आहे का, हे तपासले जात आहे.घटनेनंतर आजदेपाडा परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, दोषींना लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.
