डोंबिवली

विद्यानिकेतन शाळेच्या बसवर लावलेला “माय मरो… मौसी जगो!” हा बॅनर सध्या डोंबिवलीसह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे. केवळ एक बॅनर नव्हे, तर मराठी भाषकांच्या अस्मितेचा ओरखडा ठरलेला हा संदेश मराठीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिक्षण क्षेत्रातूनच उमटलेला थेट आवाज आहे.या बॅनरच्या माध्यमातून शाळांमधील वाढती हिंदी सक्ती, मराठी भाषेचा घटता वापर आणि शिक्षण विभागाचे उदासीन धोरण यावर ठळक भाष्य करण्यात आलं आहे. अनेक शाळांमध्ये सातवी-आठवीच्या पुढे मराठी विषय बंद केला जातो, तर काही शाळांमध्ये २० पेक्षा कमी मराठी विद्यार्थ्यांसाठीही हिंदी सक्ती करण्यात येते. यामुळे मराठी भाषक विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक दिली जाते, असा आरोप शिक्षक आणि पालकांकडून करण्यात आला आहे.विशेष म्हणजे हा विरोध कुठल्याही राजकीय पक्षाकडून नव्हे, तर शाळेतील शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि पालकांनीच एकत्र येऊन व्यक्त केला आहे. त्यामुळे या आंदोलनास अधिक व्यापक आणि सामाजिक स्वरूप प्राप्त झालं आहे. ‘माय मरो… मौसी जगो’ हा बॅनर केवळ एक वाक्य नसून, मराठी अस्मितेवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधातील मनोवेदनेचा आवाज ठरतो आहे.दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना विशेष महत्त्वाची ठरते. शालेय पातळीवरून उठलेला हा आवाज आता शहरभर आणि राज्यभर पोहोचत आहे.मराठी भाषा वाचवण्यासाठी फक्त राजकारण नाही, तर समाजाच्या सर्व थरांतून आवाज उठण्याची गरज आहे हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *