डोंबिवली : डोंबिवलीच्या खोणी पलावा परिसरातील एका हाय प्रोफाईल इमारतीवर छापा मारून मानपाडा पोलिसांनी तब्बल २ कोटी १२ लाख रुपये किमतीची जवळपास दोन किलो एमडी ड्रग्स जप्त केली आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात २ पुरुष आणि एक २१ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. या कारवाईने संपूर्ण डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही आरोपी मुंब्रा येथील रहिवासी असून, त्यांनी डोंबिवलीतील या हाय प्रोफाईल इमारतीत फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्या ठिकाणी ते एमडी ड्रग्सचा साठा करून डोंबिवली, ठाणे, कल्याणसह शाळा परिसरात विक्रीसाठी हे ड्रग्स पाठवत असल्याचे उघड झाले आहे.हे तिन्ही आरोपी एका कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याची माहिती असून, त्याच माध्यमातून ते इतर शहरांशी संपर्क साधत असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांवर कलम 8 (C), 21 आणि 29 नुसार गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशी सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणात आणखी तीन आरोपी फरार असून, मानपाडा पोलिसांच्या तीन पथका त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच या फरार आरोपींनाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.या धडक कारवाईमुळे डोंबिवलीतील हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत असून, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एका सामान्य इमारतीच्या फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांकडून अशा इमारतींवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.या घटनेमुळे डोंबिवली पुन्हा एकदा ड्रग्ससंदर्भात चर्चेत आली असून, पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने करून शहरातील तरुण पिढीला वाचवण्याचे मोठे आव्हान स्वीकारले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *