डोंबिवली (रोशनी खोत ) : पश्चिमेतील गरीबाचापाडा प्रभागाचे माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपच्या पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याकडे त्यांनी आपले राजीनामे सुपूर्द केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने भाजपमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.:

डोंबिवली शहरात राजकीय क्षेत्रात सक्रिय आणि तीन वेळा निवडून आलेले नगरसेवक विकास म्हात्रे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना गटनेते आणि स्थायी समिती सभापतीपदासारखी जबाबदारी दिली होती. त्यांच्या कार्यकाळात गरीबाचापाडा प्रभागात रस्ते, नाली, पाणी यांसारख्या विकासकामांसाठी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी मिळवण्यात त्यांनी यश मिळवलं.मात्र गेल्या दीड वर्षांपासून ते पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा होती. वेळोवेळी त्यांनी पक्षातील धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः स्थानिक भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी मतभेद आणि पक्षाकडून होत नसलेले सहकार्य यामुळे ते नाराज होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान विकास म्हात्रे यांची भूमिका पक्षासाठी संशयास्पद वाटल्याने, त्यांच्या भाजपमधून बाहेर पडण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.”पक्षाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे आणि माझ्या विचारलेल्या मुद्द्यांवर कोणतीही ठोस चर्चा न झाल्यामुळे नाईलाजाने मी आणि माझ्या पत्नीने राजीनामा दिला आहे,” असे म्हात्रे दाम्पत्याने स्पष्ट केले.या राजीनाम्यामुळे डोंबिवलीतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राजीनामा भाजपसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.
