*कोई हमसे जितना पाये चले चलो ‘चा बल्लारपुरातून वाजला बिगूल*
*मिशन शक्ती उपक्रमाचा सुधीर मुनगंटीवार- आमीर खान यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी शुभारंभ*
*२०२४ च्या ऑलिम्पिकसाठी चंद्रपूर – गडचिरोली सज्ज : सुधीर मुनगंटीवार*
*शिक्षणापेक्षाही क्रीडा क्षेत्रात जगण्याचा अधिक आनंद : आमीर खान*
चंद्रपूर (अजय निक्ते) : २०२४ च्या ऑलम्पिकमध्ये देशाचे, राज्याचे प्रतिनिधित्व करताना चंद्रपूर – गडचिरोलीचे जिगरबाज मुले निश्चितच पदकांना गवसणी घालतील. मिशन शौर्यतून अवघ्या महाराष्ट्राला ही झलक पाहायला मिळाली आहे. मिशन शक्तीमधूनआमचा संकल्प निश्चित आहे. त्यावर मोहोर लागेल, असे आशावादी प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते आमिर खान यांच्या उपस्थितीत त्यांनी राज्यव्यापी मिशन शक्तीचा शुभारंभ केला.
बल्लारपूर येथील वनविकास महामंडळाच्या आवारात क्रीडा व युवा सेवा संचालनालय यांच्यामार्फत झालेल्या या शानदार सोहळ्याला दहा हजारावर तरुणाईने गर्दी केली होती. उपस्थित तरुणाईला संबोधित करताना मुनगंटीवार यांनी २०२४ च्या ऑलम्पिकमध्ये पदक मिळविणाऱ्यामध्ये चंद्रपूरचा खेळाडू असावा,अशी अपेक्षा व्यक्त केली.
तत्पूर्वी, विसापूर जवळील स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. ३९ कोटी ८५ लाख खर्चून तयार करण्यात आलेले हे स्टेडियम आहे. सुरक्षा व्यवस्था, खेळांकरिता हॉल, पॅव्हेलीयन इमारत, वसतिगृह, अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा या सुविधांनी युक्त आहे. या स्टेडियममध्ये लॉन टेनिस कोर्ट, कब्बडी, खो खो , बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, ४०० मीटर सिंथेटिक धावपट्टी, जलतरण तलाव, धनुर्विद्या या आठ प्रकारच्या क्रीडा प्रकाराला आवश्यक सुविधा आहेत.या ठिकाणी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.
या कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर विधानसभेचे आमदार नानाभाऊ शामकुळे, राजुरा विधानसभेचे आमदार संजय धोटे,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, राज्य क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा विभाग नागपूरचे उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, महापौर अंजली घोटेकर,समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंता बोबडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर उपस्थित होते.
तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या आमिर खान या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने मोठ्या संख्येने जिल्हाभरातून नागरिक उपस्थित झाले होते.यावेळी त्यांनी आमिर खान यांनी आपल्या चित्रपटातून कायम समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आमिर खानचे चित्रपट केवळ मनोरंजनाचे नसतात तर त्यातून समाजाला एक सुप्त संदेश दिला जातो. त्याचमुळे त्यांना आज आम्ही या ठिकाणी पाचारण केले असून आज त्यांच्या साक्षीने आम्ही ऑलिम्पिक जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. हे आम्हाला सांगायचे आहे,असे त्यांनी तरुणांना आवाहन केले.
चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील तरुण हे आवाहन पेलू शकतात. याची खात्री आम्हाला मिशन शौर्य ,मध्ये झाली मिशन शोर्य, मध्ये ज्या मुलांनी कधी विमान बघितले नाही त्या मुलांनी विमानाच्या उंचीवर असणाऱ्या एव्हरेस्टला गवसणी घातली, त्यांच्यासाठी उत्तम क्रीडा सुविधा आम्ही उपलब्ध करीत आहोत.
चंद्रपूर व परिसरातील विद्यार्थ्यांचा यूपीएससी, एमपीएससी परीक्षेमध्ये टक्का वाढावा यासाठी मिशन सेवेला सुरुवात केली आहे. अनेक मुलांना यश येत आहे. आता तर आयआयटीच्या प्रवेश परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मुलगा अवघ्या देशात पहिला आला आहे.
विसापूर जवळ नुकतीच आम्ही सैनिकी शाळा सुरू केली आहे. या सैनिकी शाळेतील विद्यार्थी की पुढे जाऊन देश सेवा करणार आहेत. मला आनंद होईल की, जेव्हा नेव्ही आर्मी,एअरफोर्समध्ये उच्च अधिकारी सांगतील की, होय मी चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचा विद्यार्थी आहे.
यावेळी चंद्रपूरच्या युवा शक्तीचा परिचय करून देताना मुनगंटीवार म्हणाले, आमिर खान यांनी हे जाणून घ्यावे की, या चंद्रपूरच्या कोळशाच्या खाणी मध्ये अनेक सिक्रेट स्टार त्यांच्या पुढे बसलेले आहेत. त्यांच्यातील हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी आपल्याला ठिकाणी बोलवले आहे. आपण अतिशय उत्तम ,असे चित्रपट निर्माण करता. समाजातील छोट्या छोट्या बाबींचे संशोधन करता. आपल्यातील संशोधकांचे मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना लाभावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
*मला सर्वाना भेटून आनंद झाला : आमीर खान*
आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करीत आमिरने समोरच्या तरुणाईशी संवाद साधला…. ते म्हणाले, आपणाशी बोलून मला खूप आनंद झाला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मी जेव्हा पोचलो तेव्हा पासून अगदी आनंदी चेहऱ्याने तरुण माझे सर्वत्र स्वागत करत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय सुंदर ,असे स्टेडियम तयार केलेले आहे. मला खात्री आहे की या भागातील तरुण मोठ्या संख्येने क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन आपल्या देशाचे नावलौकिक वाढवतील. मी त्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, असेही त्यांनी स्पष्ट स्पष्ट केले.
आयुष्यात शिक्षणापेक्षा खेळ अनेक सुखद आठवणी देते. मी कोणते विषय,कोणत्या वर्गात काय काय शिकलो हे जरी विसरलो असलो तरी मला क्रीडा प्रकारातून जे मिळाले त्याचा आनंद कायम राहिला आहे. ते आठवणीतही राहते. खेळ कसे जिंकायचे हे शिकवते. खेळ आयुष्य जगायला शिकवते. यावेळी त्यांनी आपल्या लगान चित्रपटातील कोई हमसे जितना पावे चले चलो या गाण्याच्या ओळी सुद्धा सादर केल्या. चंद्रपूर- गडचिरोली येथील तरुणांनी या गाण्यातील ओळीप्रमाणे आपले मार्गक्रमण करावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी केले. त्यांनी मिशन सेवा, मिशन शक्ती, मिशन शौर्य यामार्फत जिल्ह्यातील तरुणाईला मोठ्या प्रमाणे संधी उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमांमध्ये चंद्रपूरची शान असणारे एव्हरेस्टवीर मनीषा धुर्वे, उमाकांत मडावी, प्रमेश आडे, कविदास काठमोडे, इंदू कन्नाके, अंतू बाई कोटनाके, सुरज आडे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळणारे विनोद निखाडे,अनिल पचगाडे, प्रकाश तुमाने ,आतिश दुर्वे, वैभव नायडू, निशांत गर्गे सोनी जयस्वाल, प्रशती कतले, चैताली किनाके पूर्वा खेरकर यांचाही सत्कार करण्यात आला.
*आमीर खान यांच्याकडून सिंहावलोकनचे कौतुक*
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या पाच वर्षाच्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या सिंहावलोकन या कॉफी टेबल बुकचे देखील प्रकाशन करण्यात आले. आमिर खानने यातील मजकुराबाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्याकडून घेतली. मान्यवरांनी सचित्र आढावा असणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले.
हौशी नाट्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात अव्वल ठरलेल्या नवोदिता च्या नथिंग टू से या या नाटकाच्या संपूर्ण टीमचे यावेळी आमिर खान यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. डॉ.जयश्री कापसे गावंडे, बकुळ धवने, नूतन धवने, जयंत वंजारी, हेमंत गुहे, तेजराज चिकटवार, पंकज नवघरे, अंकुश राजुरकर, आदींचा या वेळी सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याच्या सुरुवातीला आनंद निकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मल्लखांबच्या कसरतीया सोहळ्याच्या सुरुवातीला आनंद निकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मल्लखांबच्या कसरती करून सर्वांची मने जिंकली तसेच वर्धा येथील हौशी योगा असोसिएशनच्या टीमने योगा प्रात्यक्षिके करून दाखवली. हौशी योगा असोसिएशनच्या टीमने योगा प्रात्यक्षिके करून दाखवली. या कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी केले.
