कल्याण दि. २७ एप्रिल : येत्या लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. कल्याण पूर्व येथे आयोजित शिक्षक मेळाव्याद्वारे त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला.

शिक्षकाचा पेशा हा सर्वात वेगळा असतो, त्यांना एक पॅशन असतं, सगळेच शिक्षक होऊ शकत नाहीत. सध्या शिक्षकांच्या नावामागे टीआर लावण्याची मागणी केली जातेय, पण आज डॉक्टरच्या नावामागे डीआर, इंजिनिअरच्या नावामागे ईआर ज्यांच्यामुळे लागतं, ते शिक्षक आहेत अशा शब्दांत खा. डॉ. शिंदे यांनी शिक्षकांचा आणि त्यांच्या कामाचा गौरव केला. तसेच आपला पाया मजबूत करण्याचे काम शिक्षक करतात, त्यामुळे देशाला पुढे नेण्यात शिक्षकांचा मोठा सहभाग असल्याचे यावेळी सांगत शिक्षकांच्या सर्व प्रलंबित मागण्या येत्या काळात महायुती सरकार नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वासही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रशांत भामरे सर, भाजपा शिक्षक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल बोरनारे, माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, उपतालुकाप्रमुख राहुल गणपुले, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक रवी पाटील, नितीन पाटील, रवींद्र पाटील, माजी नगरसेविका माधुरी काळे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!