पुणे : कोरेगाव भीमा येथे २०५ वा शौर्य दिनानिमित्तविजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १२ लाख अनुयायांनी गर्दी केली.

पुणे जिल्हयातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी शौर्य दिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी दाखल होतात. ३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठया प्रमाणात गर्दी केली हेाती. रात्री १२ वाजता सामुहिक बुध्द वंदना पठण करून शौर्य दिनाला सुरूवात झाली. विजयस्तंभ आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला हेाता. तसेच सीसीटिव्ही कॅमे-याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी अभिवादन केले.

ऐतिहासिक विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारण्यासाठी १०० एकर जमीन संपादित करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यास दरवर्षी 1 जानेवारीला शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. त्यामुळे या विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची  १०० एकर जमीन शासनाने संपादित करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. आज दुपारी 12 वाजता रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले.

 ऐतिहासिक विजय स्तंभ स्मारकासाठी समाज कल्याण विभाग आणि प्रशासनाने आराखडा तयार केला असून त्यासाठी आवश्यक शंभर एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घ्यावा. एकदा भूसंपादन निर्णय राज्य सरकार ने घेतला की लगेच विजयस्तंभ परिसरातील अतिक्रमण निर्मूलन करता येईल.स्मारकासाठी ज्यांच्या जमिनी संपादित होतील त्यांना योग्य मोबदला देऊन योग्य पुनर्वसन करावे या मागणीसाठी आपण लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले. भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकासाठी अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील तसेच संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन संरक्षण मंत्रालयातर्फे काही निधी मिळेल का याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *